पुणे : महाराष्ट्रातील हवामानात मेअखेर मोठे बदल जाणवत आहेत. केरळमध्ये येत्या आठवडाभरात मान्सून दाखल होण्याचा अंदाज आहे. तर राज्यात मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात झाली आहे. आज कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भात देखील वादळी पावसाची शक्यता आहे. ३० मे रोजी ताशी ३० ते ६० किमी वेगाने वारे वाहून गडगडाटी पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने १५ जिल्ह्यांना अलर्ट जारी केला आहे.
कोकणात उष्ण आणि दमट हवामान घामटा काढत आहे. दक्षिण कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग मध्ये आज तुरळक पावसाची शक्यता आहे. तर मुंबईसह उत्तर कोकणात हवामान कोरडे राहील. मुंबईत कमाल तापमान ३२-३६ अंश सेल्सिअस राहील. आद्रतेमुळे प्रचंड उकाडा जाणवेल. ३१ मेपासून संपूर्ण कोकणात पाऊस सक्रीय होण्याची शक्यता आहे.
मध्य महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, सातारा आणि सांगली जिल्ह्यांत आज तुरळक पावसाची शक्यता आहे. तर सोलापुरात हवामान कोरडे राहील. कमाल तापमान ३५-४० अंशांपर्यंत राहील. दुपारी आणि सायंकाळी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. येत्या दोन दिवसांत वादळी पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे.
उत्तर महाराष्ट्रात गेल्या काही काळापासून उष्ण आणि कोरडे हवामान कायम होते. आता मात्र हवापालट झाल्याचे चित्र असून मान्सूनपूर्व पाऊस धुमाकूळ घालण्याची शक्यता आहे. आज ताशी ३०-५० किमी वेगाने वारे वाहून गडगडाटी पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने पुढील ४ दिवसांसाठी नाशिकसह धुळे, नंदुरबार, जळगाव जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. कमाल तापमान ३८-४२ अंश सेल्सिअस राहील.
मराठवाड्यात गेल्या काही काळापासून उष्णतेचा कहर सुरू आहे. मेअखेर हवामानात मोठ्या बदलांची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगरसह सर्वच जिल्ह्यांत आज तुरळक पावसाची शक्यता आहे. तर ३१ मेपासून ताशी ४०-५० किमी वेगाच्या वार्यांसह गडगडाटी पावसाचा अंदाज असून हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. कमाल तापमान ३८-४२ अंशांच्या दरम्यान राहील.
विदर्भात उष्णतेच्या लाटेसोबत वादळी पावसाचं संकट घोंघावत आहे. आज संपूर्ण विदर्भात ताशी ४०-६० किमी वेगाने वारे वाहून विजांसह गडगडाटी पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने पुढील ४ दिवसांसाठी काही जिल्ह्यांना ऑरेंज तर काहींना यलो अलर्ट जारी केला आहे. अमरावती, चंद्रपूर, वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट असून गारपिटीची शक्यता आहे. कमाल तापमान ४०-४४ अंशांपर्यंत राहील.
एकंदरीत, मेअखेर महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पाऊस सक्रीय झाला आहे. मात्र, उष्णतेची लाट कायम आहे. येत्या दोन दिवसांत कमाल तापमानात मोठा बदल होणार नाही. त्यानंतर हळूहळू २-५ अंशांपर्यंत तापमानात घट होण्याची शक्यता आहे. किमान तापमान स्थिर राहील. विजांसह वादळी पावसाची शक्यता असल्याने नागरिकांना योग्य ती काळजी घ्यावी लागेल.